Pages

खेळ :- कबड्डी



🤼‍♀ *खेळ:-कबड्डी* 🤼‍♀

🔅 कबड्डी : एक भारतीय सांघिक खेळ. हुतुतू या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात या खेळाबद्दल विशेष आवड आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगात या खेळाचा उल्लेख हमामा, हुंबरी, हुतुतू अशा नावांनी केलेला सापडतो. बंगालमध्ये ‘हुडू’, दक्षिण भारतात ‘चेडुगुडु’ व उत्तर भारतात ‘कबड्डी’ अशा विविध नावांनी हा खेळ पूर्वीपासून खेळला जात आहे. पूर्वी या खेळाचे स्वरूप अनियमित होते. खेळाडूंच्या संख्येला व क्रीडांगणाला मर्यादा नव्हती. दोन संघांतील एकेका खेळाडूने आलटून पालटून श्वास रोखून विशिष्ट शब्दोच्चार करीत विरुद्ध संघाच्या क्षेत्रात चढाई करून जावयाचे, त्यातील प्रतिस्पर्ध्यांना हाताने किंवा पायाने स्पर्श करून त्यांना बाद करावयाचे व त्यांच्या पकडीत न सापडता दम संपण्यापूर्वीच परत आपल्या क्षेत्रात यावयाचे. चढाई करणाऱ्याचा दम जाईपर्यंत बचाव करणारांनी त्याला पकडण्याचा प्रयत्‍न करून मध्यरेषेला स्पर्श करावयास प्रतिबंध करावयाचा हा या खेळाचा मुख्य गाभा होय. दम गेला, तर तो खेळाडू बाद होतो. परंतु दम जावयाच्या आत सुटून मध्यरेषेला त्याने स्पर्श केला तर त्याला पकडणारे सर्व खेळाडू बाद होतात. आता नव्या नियमांनी हा खेळ बांधला गेल्याने त्यात शिस्त येऊन वैयक्तिक व सांघिक कौशल्याला पुष्कळच वाव मिळाला आहे.





🔅 पुण्याच्या ‘डेक्कन जिमखाना’ या संस्थेने १९१५-१९१६ साली प्रथम या खेळाचे नियम तयार करून सामने भरविण्यास सुरुवात केली. १९३३ साली अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने भारतीय खेळांचा प्रसार करावयाच्या धोरणानुसार या खेळात प्रथम नियमबद्धता आणि आकर्षकपणा उत्पन्न केला. अनुभवी खेळाडू आणि तज्ञांशी चर्चा करून नियमांत जरूर त्या सुधारणा केल्या. या नियमांची हिंदी व इंग्रजी भाषांतरे प्रसिद्ध केली. १९३८ सालापासून या मंडळाने भारतातील मराठी भाषिकांचे सात विभाग करून स्त्रीपुरुषांचे प्रातिनिधिक सामने घ्यावयास सुरुवात केली. त्यावेळी खेळाडू, पंच आणि प्रेक्षक या सर्वांना आकर्षक वाटेल अशी सामन्यांची रचना करून वैयक्तिक गुणावगुणांची नोंद करणारी गुणपत्रकेही प्रचारात आणली.





🔅भारतीय ऑलिंपिक क्रीडासामन्यांच्या समितीने कबड्डीला १९५८ पासून मान्यता दिलेली असून आता या खेळाचे स्वरूप थोडेसे बदलून त्याला ‘कबड्डी’ नाव अधिकृत म्हणून संमत केले आहे. या खेळाच्या अखिल भारतीय आणि राज्यनिहाय नियंत्रक संस्थाही स्थापन झालेल्या असून आता हा खेळ हुतुतू आणि कबड्डी या दोन्ही नावांनी खेळतात.





🔅हुतुतूचे क्रीडांगण ९⋅१४४ × १५⋅२४० मी असते. त्याच्या मध्यरेषेपासून दोन्ही बाजूंना ३⋅०४८ मी. वर निदान रेषा असते. त्याच्या पलीकडील भागाला राखीव क्षेत्र असे म्हणतात. छोट्या मुलांसाठी लहान क्रीडांगण असते.





🔅प्रत्येक संघात नऊ गडी असतात. सामन्यात १५ मिनिटांचे तीन डाव खेळतात. डाव संपल्यानंतर पाच मिनिटे विश्रांती असते. एका डावाची वेळ संपल्यावर दोन्ही संघात जितके गडी नाबाद असतील, त्यांचे प्रत्येकी दोन गुण मिळतात. सामन्यासाठी खेळाडूंचे वर्गीकरण खेळाडूच्या वजनावर करतात. मध्यरेषेवर एक आणि दोन निदान रेषांवर एकेक असे तीन पंच असतात. एका संघाचे सर्व गडी बाद झाल्यास ‘लोण’ होते. त्यासाठी विरुद्ध संघाला अधिक गुण मिळतात.





🔅अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाच्या नियमांनुसार तीन पद्धतींनी कबड्डी खेळतात. ज्या संघाचा खेळाडू बाद होईल, त्याच्याविरुद्ध संघाचा गडी जिवंत होतो व खेळात भाग घेऊ लागतो. त्या पद्धतीला संजीवनी पद्धती म्हणतात. गनिमी पद्धतीत एकदा बाद झालेला खेळाडू लोण होईपर्यंत किंवा तो डाव संपेपर्यंत खेळू शकत नाही. बाद झालेला खेळाडू खेळात भाग घेऊ शकतो; पण विरुद्ध संघाला त्याबद्दल गुण देणाऱ्या पद्धतीला अमर पद्धती म्हणतात. इतर सर्व नियम या तीनही प्रकारांत सारखेच असतात.





🔅कबड्डीमुळे चापल्य, तडफ, धाडस, निरीक्षणशक्ती, योजकता आणि संघभावना इ. गुणांचे परिपोषण होते.



No comments:

Post a Comment